Shirur : शिरूर तालुक्यातील वढूबुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला साजेसे असे भव्य स्मारक होणार


Shirur

शिरूर दिनांक प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला साजेसे असे भव्य स्मारक उभारणी व विकास आराखड्यावर चर्चेसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वढू-तुळापूरला भेट देत शंभूराजांच्या समाधिस्थळ परिसरात पाहणी करून ग्रामस्थांशीही चर्चा केली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळी भव्य स्मारक उभारणी तसेच वढू-तुळापूर परिसराच्या विकासासाठी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास तत्त्वतः मंजुरी दिली. तसेच विधिमंडळ अधिवेशनातही स्मारक व परिसर विकासासाठी १५० कोटींच्या निधीबाबत घोषणा केली. त्यानंतर प्रशासनाकडूनही या कामासगती मिळाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार अशोक पवार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वढू बुद्रुक तसेच तुळापूर येथे भेट देवून समाधिस्थळी दर्शन घेत समाधिस्थळ व परिसराची पाहणी केली.आराखड्यांतील अंतर्गत रस्त्यांसह विविध नियोजित सोयीसुविधांसह इतर बाबी आणि त्यासाठी आवश्यक व प्रत्यक्षात उपलब्ध असलेली जागा, भीमानदी घाट परिसर याबाबत वास्तुविशारद तसेच ग्रामस्थांशीही चर्चा केली.
गेले अनेक दिवस शंभू भक्तांच्या मनात असलेल्या छत्रपती संभाजीराजांच्या ऐतिहासिक स्मृतिस्थळ विकासाचे स्वप्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
माध्यमातून व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून साकार होत असल्याबद्दल शंभूभक्त समाधान व्यक्त करत आहेत. तसेच याकामी आवश्यक असलेल्या सर्वतोपरी मदतीची ग्वाहीही वढ-तुळापूर ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकारभाऱ्यांनी दिली. तर यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी शिरूर व हवेलीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तसेच वढू व तुळापूरचे आजी माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed